पुणे मानाचा गणपती माहिती | Pune Ganpati Bappa morya |

पुणे मानाचा गणपती माहिती | Pune Ganpati Bappa morya |

पुणे मानाचा गणपती माहिती | Pune Ganpati Bappa morya |

भारतातला गणपती उत्सव म्हटलं की महाराष्ट्र डोळ्यासमोर येतो. महाराष्ट्रा मध्येच सर्वाधिक धुमधडाक्यात गणपती उत्सव साजरा केला जातो. महाराष्ट्रातील गणपती उत्सवाचा विचार केला तर सर्वप्रथम पुणे नजरेसमोर येतं आणि पुण्यातील गणपती म्हटले की मानाच्या गणपतीचे आकर्षण असते. पुण्याच्या वैभवशाली इतिहासात गणपतीच्या मिरवणुकीची एक मोठी परंपरा राहिलेली आहे.

या मानाच्या गणपतीच्या परंपरेचा इतिहासही खूप रोचक आणि जाणून घेण्यासारखा आहे. तुम्हाला असा कधी प्रश्न पडला आहे का? की, मानाचे पाच गणपती का आहेत? दहा किंवा पंधरा का नाहीत. तसेच सध्या जे मानाचे गणपती म्हणून ओळखले जातात. ते का ओळखले जातात? त्यांचा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा असा क्रम कोणी ठरवला आणि कसा ठरवला. या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आपण या लेखात करूयात.

अठराव्या शतकात मराठा साम्राज्य आपल्या सर्वोच्च शिखरावर होते. मराठा साम्राज्याच्या झेंडा अटकेपार लावला गेला होता. आजच्या अफगाणिस्तान पर्यंत मराठा साम्राज्य पसरले होते. मराठ्यांनी पानिपतची लढाई हरली नसती तर भारताचा इतिहास काही वेगळाच असला असता. या विषयावर नंतर कधीतरी बोलूया. आपण आपल्या विषयाकडे वळूया. मराठा साम्राज्याची राजधानी होती पुणे आणि या मराठा साम्राज्याची दोरी पेशव्यांच्या हातात होती. या पेशव्यांचे आराध्य दैवत गणपती होते. यामुळेच पुण्यात पेशव्यांनी अनेक ठिकाणी गणपती मंदिरे बांधलेली आहे. अगदी शनिवारवाड्यातही गणेश महाल हा एक मोठा महाल होता. एका इंग्रजाने पेशव्याच्या दरबाराचे चित्र काढलेले आहे. त्या चित्रातही गणपती दिसतो. एकूणच पेशवे आणि मराठा साम्राज्यासाठी गणपती मानाचा होता.

आपल्या कहाणीचा इथून दुसरा भाग सुरु होतो. एकोणिसाव्या शतकात इंग्रजांनी संपूर्ण भारतभर कब्जा केलेला असतो. इंग्रजांच्या विरोधात केलेला १८५७ चा उठाव अयशस्वी झालेला होता. या पदरात पडलेल्या अपयशामुळे भारतीय जनता निराश झाली होती. जनतेला बलाढ्य ब्रिटीश साम्राज्यासमोर हतबल वाटू लागले होते. इंग्रज सतत भारतीय संस्कृतीचा अपमान करत असायचे. एकप्रकारे विदेशी संस्कृती भारतीयावर थोपवली जात होती. या सर्व पार्श्वभूमीचा विचार करून लोकमान्य टिळकांनी १८९३ साली सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला. या उत्सवाच्या माध्यमातून लोकांना एकत्र तर करायचं होतचं पण भारतीय संस्कृती बद्दल समाजात जी हीनता पसरली होती. ती देखील दूर करायची होती. अशावेळी गणपती बाप्पा जनतेच्या मदतीला धावून आले आणि पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवास सुरुवात झाली.

सार्वजनिक गणेशोत्सवास सुरुवात झाल्यास लोकांनी गणपती मंडळे स्थापन करून मोठ्या प्रमाणात गणपती बसवण्यास सुरुवात केली पण त्यावेळी एक नवीनच समस्या उभी राहिली ती म्हणजे आता गणपती मंडळाची संख्या वाढली, विसर्जनाची मिरवणूक निघू लागली. या विसर्जनाच्या मिरवणुकीत कोणता गणपती पुढे असेल आणि कोणता मागे? सर्व गणपती मंडळात या मुद्द्यावरून भांडणे सुरु झाली. त्यावेळी पुणे काही आतासारखे अवाढव्य शहर नव्हते. एकप्रकारे गाव होते. त्यात तीन – चारच मुख्य रस्ते होते. त्यातूनच गणपतीच्या विसर्जनाची मिरवणूक निघायची. तेव्हा हा वाद होणे साहजिकच होते. हा वाद चांगलाच मोठा झाला आणि तो लोकमान्य टिळकांच्या समोर गेला. लोकमान्य टिळक त्याकाळातील मोठे आणि सर्वमान्य नेते होते. त्यांचे निर्णय सर्वांना मान्य असायचे. या वादात लोकमान्य टिळकांनी आपला निर्णय दिला आणि मिरवणुकीच्या सुरुवातीला असणारे मानाचे पाच गणपती आणि त्यांचा क्रम ठरवला. हा क्रम लावण्यामागे कोणता तर्क होता, ते आपण पाहूया. गेली १२५ वर्ष हा क्रम बारकाईने पाळला जातो आहे.

हा क्रम आणि मानाचे पाच गणपती पुढीलप्रमाणे आहेत.

१ ) कसबा गणपती –

महाराष्ट्रात तुम्ही कोणत्याही गावात जा. त्या गावाला एक ग्रामदैवत असणार म्हणजे असणार. कोणत्याही गावात ग्रामदैवताला मानाचे स्थान असते. पूर्ण गावाचे ते दैवत असते. पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपती आहे. या गणपतीची स्थापना खुद्द आईसाहेब जिजाऊनी केलेली आहे. शहाजी राजेंनी १६३६ साली लाल महाल बांधला होता. त्याच्या शेजारीच कसबा गणपती आहे. छत्रपती शिवाजी महाराज कोणत्याही लढाईला निघण्यापूर्वी कसबा गणपतीचे दर्शन घेत असतं. अशा अनेक कारणामुळे कसबा गणपतीचे स्थान खूप वरचे आहे. यामुळे विसर्जनाच्या मिरवणुकीत पहिला मान हा कसबा गणपतीला मिळाला आणि याला कोणीही हरकत घेतली नाही. सर्वांनी हे एकमताने मान्य केले. तेव्हापासून सर्वात आधी कसबा गणपती असतो आणि मग बाकीचे सगळे असतात.

कसबा गणपतीची एक रोचक कथा आशी आहे की, सुरुवातीच्या काळात कसबा गणपतीची मूर्ती तांदळाएवढी होती. असं म्हणतात की या गणपतीला सातत्याने आणि वर्षानुवर्ष शेंदूर लावल्याने ती साडेतीन फुटाची झालेली आहे.

कसबा गणपतीसमोर मेळे, मोठ्या गायकांचे जलसे ठेवण्याची एक मोठी परंपरा आहे. जी आजही पाळली जाते. हा मानाचा पहिला गणपती असूनही मिरवणूक मोठा गाजावाजा न करता पारंपारिक पद्धतीने आणि साधेपणाने काढली जाते.

२) तांबडी जोगेश्वरी –

पुण्याला जसे ग्रामदैवत आहे त्याचप्रकारे ग्रामदैवता देखील आहे. पुण्याची ग्रामदैवता ही तांबडी जोगेश्वरी आहे. तांबडी जोगेश्वरीचे मंदिर पुरातन आहे. हे मुळचे दुर्गादेवीचे मंदिर असून ते पंधराव्या शतकात बांधले गेले आहे. असे मानतात. पुण्याची ग्रामदैवता आणि पुरातन मंदिर असल्याने दुसरा मान हा तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळाला मिळाला. मंदिराच्या पितळी देव्हाऱ्यात गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली जाते. अप्पा बळवंत चौकाजवळ तांबडी जोगेश्वरीचे मंदिर आहे. सध्या या मंदिराच्या बाजूलाच मांडव घालून गणपतीची स्थापना केली जाते.

३ ) गुरुजी तालीम गणपती मंडळ –

या गणपती मंडळाची सुरुवात खूप महत्वाची आहे. हे गणपती मंडळ हिंदू- मुस्लीम एकात्मतेचे प्रतिक आहे. या मंडळाची स्थापनाच हिंदू- मुस्लिमांनी एकत्र येऊन केलेली आहे. या गणपती मंडळाची स्थापना करण्यात भिकू शिंदे, शेख कासम वल्लाद, नानासाहेब खासगीवाले या मंडळींनी पुढाकार घेऊन केलेली आहे.

इंग्रजांनी भारतवार राज्य करण्यासाठी ‘फोडा आणि राज्य करा’ या नीतीचा अवलंब केला होता. हिंदू व मुस्लिमांना एकमेकांविरुद्ध भडकावून इंग्रजांना भारतावर कब्जा ठेवणे सोपे झाले होते. या इंग्रजांच्या नीतीचा जोरदार विरोध करण्यासाठी हिंदू- मुस्लीम ऐक्य साधण्यासाठी स्वातंत्र्य लढ्यातील भारतीय नेते अनेक प्रयत्न करत होते. त्या प्रयत्नाचा भाग म्हणून या मंडळाची स्थापना केलेली होती. या कारणामुळे ही घटना इतिहासात महत्वाची आहे.

या मंडळाचे वैशिष्ठ केवळ हिंदू- मुस्लीम प्रतिक एवढेच नाही तर हे सर्वात जुने मंडळ आहे. या मंडळाची स्थापना १८८७ साली झालेली आहे म्हणजे सार्वजनिक विसर्जन मिरवणूक सुरु होण्याच्या सहा वर्षापूर्वी. या दोन्ही कारणामुळे या गणपतीला मानाचे तिसरे स्थान दिले गेले.

४ ) तुळशीबाग गणपती मंडळ-

पुण्यातले सर्वाधिक वर्दळीचे आणि प्रसिद्ध ठिकाण म्हणजे तुळशीबाग. बाहेरून कोणी पुण्याला आला आणि तुळशीबागला गेला नाही असं कधी होत नाही. या तुळशीबागेत जुने आणि ऐतिहासिक असे रामाचे मंदिर देखील आहे. या तुळशीबागेत गणपतीची स्थापना १९०१ साली करण्यात आली. या महत्वामुळेच हा चौथा मानाचा गणपती ठरला.

तुळशीबागेतील गणपती मूर्तीची उंची तब्बल तेरा फुट आहे. या गणपती मंडळाचा देखावा पाहण्यासारखा असतो. पुण्यातील सर्वोत्कृष्ट देखावा आणि सजावट असणाऱ्या गणपती मंडळापैकी हा एक गणपती आहे. या गणपतीला पाहण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी होत असते.

५ ) श्री केसरीवाडा गणपती –

या गणपती मंडळाची सुरुवात स्वतः लोकमान्य टिळकांनी केलेली आहे. या गणपती मंडळात दरवर्षी लोकमान्य टिळकांचे व्याख्यान व्हायचे. या व्याख्यानाला लोकांची तुंबड गर्दी होत असे. त्या केसरीवाड्यात जागा पुरायची नाही. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात या गणेशोत्सवाचा देखील काही वाटा आहे. असे म्हणायला हरकत नाही. हा गणेशोत्सव १८९४ सालापासून सुरु झाला.

या गणपती मंडळात भव्य- दिव्य सजावटीपेक्षा व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम अशा प्रबोधनपर कार्यक्रमावर भर दिला जातो.

पुण्यातील हे मानाचे पाच गणपती आहेत. पुण्यात आल्यास किंवा सध्या असल्यास या पाच गणपतींना जरूर भेट द्या. गेल्या १२५ वर्षाचा इतिहास तुमच्या डोळ्यासमोर उभा राहील.

Leave a Comment