भारतीय नौदलात नवीन दाखल होणार घोडदौड | Indian nodal ship
भारतीय नौदलात गेल्या काही दिवसात तीन मोठ्या घटना घडल्या आहेत. या तीन घटनांनी भारतीय नौदलाचे पूर्ण रूपच बदलून टाकले आहे. भारतीय नौदल हे जगातील एक शक्तिशाली नौदल म्हणून पुढे आले आहे.
या कोणत्या तीन घटना आहेत, ज्या घटनांनी भारतीय नौदलाची नवीन ओळख तयार केली आहे. हे आपण पाहूया.
१) भारतीय नौदलाचा झेंडा –
भारतीय नौदलाच्या झेंड्यावर ब्रिटीशांच्या काळापासून चालत आलेल्या एक उभी आणि एक आडवी अशा दोन रेषा होत्या. याला सेंट जॉर्ज क्रॉस असे म्हटले जायचे. हा झेंडा इंग्रज काळात बनवला गेला होता. भारताला स्वतंत्र्य मिळाल्यावर या झेंड्यात चार वेळा बदल करण्यात आले पण या दोन रेषा तशाच ठेवण्यात आल्या होता. त्यातला फक्त जो ब्रिटीशांचा युनियन जॅक हा झेंडा होता, तो काढून टाकला होता. बाकीच्या दोन रेषा तशाच ठेवण्यात आल्या होत्या. ब्रिटीशांच्या झेंड्याऐवजी भारताचा तिरंगा लावण्यात आला होता.
या झेंड्यातील दोन लाल रेषा ब्रिटीशांच्या जुलमी काळाची आठवण करून द्यायच्या. त्या आता पूर्णपणे काढून टाकण्यात आल्या आहेत आणि नौदलाने पूर्णपणे एक नवीन झेंडा स्वीकारलेला आहे.
या नवीन झेंड्याचे सर्वात महत्वाचे वैशिष्ठे म्हणजे या झेंड्यावरील बोधचिन्ह हे शिवाजी महाराजांच्या आरमारापासून प्रेरित आहे. या बोधचिन्हाची रचना ही शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेसारखी आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार शक्तिशाली होते. पुढील १०० वर्षाचा विचार करून महाराजांनी आपले आरमार बनवले होते.
बऱ्याच जणांना वाटेल की, झेंडा बदलला म्हणजे भारतीय नौदलात असा कोणता मोठा फरक पडला असेल? विशेषकर ज्या सैनिक संस्था किंवा दल आहेत, त्यांच्यासाठी झेंडा फार महत्वाचा असतो. त्यांच्यासाठी देश म्हणजेच झेंडा असतो. झेंड्याचे फक्त भावनिक महत्व नसते तर प्रत्यक्ष लढाईत देखील महत्व असते. हे इंग्रजांनी ९०० वर्षापूर्वी ओळखले होते. ९०० वर्षापूर्वी त्यांचा जो झेंडा होता, तो आजही आहे. समुद्रात दूरवरून आपले नौदलाचे जहाज ओळखण्यासाठी झेंडा फार महत्वाचा असतो. मदत मागण्यासाठी किंवा शत्रूच्या जहाजांना नष्ट करण्यासाठी ते जहाज नेमके कोणाचे आहे, हे ओळखणे गरजेचे असते. त्याची ओळख होत असते, ती म्हणजे झेंड्यावरून.
आपल्या झेंड्यावर देवनागरी लिपीत वरून देवता आमचे रक्षण करो, असं लिहलेलं आहे. यालाही एक गहन अर्थ आहे. समुद्रात चक्रीवादळाचे प्रमाण खूप असते. सर्वाधिक जहाजे, नौका या वादळात नष्ट होऊन जातात. त्या पावसाच्या देवाला जो पाऊस पाडतो आणि वादळही निर्माण करतो. त्याला विनंती केली आहे की, तूच आमचे रक्षण कर…
२ ) आयएनएस विक्रांत नौदलाच्या ताफ्यात –
भारतीय बनावटीची विमानवाहू युद्धनौका गेल्या आठवड्यात भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. अनेकांना वाटेल की, यात काय नवल आहे? अशा युद्धनौका अनेक वेळा भारतीय नौदलात सामील झालेल्या आहेत. पहिले तर समजून घ्या, की ही काही साधी- सुधी युद्धनौका नाहीये. भारतीय नौदलाच्या इतिहासातील सामील होणारी आयएनएस विक्रांत ही सर्वात मोठी आणि शक्तिशाली युद्धनौका आहे.
या आयएनएस विक्रांत युद्धनौकेला थोडं लांबून पाहिल्यास ही युद्धनौका एका शहराच्या आकारासारखी दिसते. ही एक युद्धनौका बनवण्यासाठी भारताला तब्बल १३ वर्ष लागली. सुमारे ५०० भारतीय कंपन्या ही युद्धनौका बनवत होत्या. पंधरा हजार लोकांनी सलग तेरा वर्ष काम करून ही युद्धनौका बनवलेली आहे.
वाचकांना इथे प्रश्न पडला असेल की, असं काय आहे. आयएनएस विक्रांत युद्धनौकेत की, ज्याला बनवायला इतकी वर्ष गेली.
या युद्धनौकेची वाहतूक क्षमता ३० विमाने आणि हेलिकॉप्टर अशी आहे. एकाच वेळी क्षमता असणारी ही जगातील तिसरी युद्धनौका आहे. एवढेच नाही तर युद्धनौकेत तब्बल २३०० कंपार्टमेंट आहेत. या युद्धनौकेची लांबी २६२ मीटर तर उंची ६० मीटर आहे. या युद्धनौकेवर चार इंजिने आहेत. ज्याची क्षमता ८८ मेगावॉट आहे. ही एवढी क्षमता आहे की, भारतातील एका शहराला वीज पुरवू शकेल. या युद्धनौकेवरील कॅन्टीन मध्ये एकावेळी ६०० लोकं जेवू शकतात. यावर एक लहानसे हॉस्पिटल आहे. ज्यात १६ बेड आहेत. हे नौदलातील आतापर्यंतचे सर्वात मोठे मेडिकल सेंटर आहे.
आयएनएस विक्रांत सारखी युद्धनौका किती महत्वाची आहे, याची एक रोमांचक कथा १९७१ च्या भारत- पाकिस्तान युद्धातील आहे. भारताकडे १९७१ च्या काळात आयएनएस विक्रांत नावाची जुनी युद्धनौका होती. ती आपण ब्रिटीशांच्या कडून घेतलेली होती. त्या काळातील ती एक अवाढव्य युद्धनौका होती.
पाकिस्तानकडे गाझी नावाची एक शक्तिशाली पाणबुडी होती. पाकिस्तानला ती अमेरिकेकडून मिळालेली होती. १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धात या गाझी पाणबुडीला एकच कामगिरी सोपविली गेली होती. ती म्हणजे आयएनएस विक्रांत युद्धनौकेला नष्ट करण्याची. आयएनएस विक्रांत त्यावेळी बंगालच्या खाडीत होते. हे पाकिस्तानला कळल्यावर त्यांनी पूर्ण भारताला वळसा घालून गाझी पाणबुडी बंगालच्या उपसागरात नेली होती. तेव्हा त्यांना समजले की, आयएनएस विक्रांतला चैन्नईला नेण्यात आले आहे. तेव्हा गाझी पाणबुडी ही चैन्नईला गेली. असे जवळपास १५ ते २० दिवस गाझी पाणबुडी आयएनएस विक्रांतचा पाठलाग करत होती. पाकिस्तानला माहित होते की, एकदा का आयएनएस विक्रांतला नष्ट केले की, भारताच्या नौदलाचे प्रचंड नुकसान होईल आणि भारताला सहज हरवता येईल. शेवटी गाझीच या पाठ- शिवणीच्या खेळत नष्ट झाली. भारताने नंतर पराक्रम करून पाकिस्तानवर मोठा विजय मिळवला आणि बंग्लादेशाची निर्मिती झाली. नंतरच्या काही वर्षात या पाणबुडीला निवृत्ती देण्यात आली.
या सत्ये कथेवरून आपल्याला समजले असेल की, आयएनएस विक्रांत युद्धनौका किती महत्वाची आहे. महत्वाचे म्हणजे ही युद्धनौका स्वदेशी आहे. या आयएनएस विक्रांतवरून एकाचवेळी १२ फायटर प्लेन आणि ६ हेलिकॉप्टर उडवता येतात. या आयएनएस विक्रांत युद्धनौकेचे वजन चक्क ४५,००० टन आहे. एवढे प्रचंड वजन असून या युद्धनौकेचा वेग ५२ किमी प्रतितास असेल. ही युद्धनौका बनवणाऱ्या अभियंत्यांनी सांगितले की, “आम्ही ही आयएनएस विक्रांत लहान मुलांसारखी घडवली आहे. तेरा वर्ष या युद्धनौकेला मोठं होताना पाहिलेलं आहे. आता अशी भावना दाटून आली आहे की, मुलगी मोठी झाल्यावर जसे तिला सासरी पाठवतात, तसं आम्ही या युद्धनौकेला भारतीय नौदलाच्या स्वाधीन करत आहोत.”
भारताचा शेजारी असलेला चीन समुद्रात आपले वर्चस्व निर्माण करू पाहत आहे. यासाठी चीन गेल्या ४० वर्षापासून तयारी करत आहे. अवाढव्य आकाराच्या पाणबुड्या आणि युद्धनौका चीन बनवत आहे. अमेरिका आणि रशिया यांच्या युद्धनौकेला देखील मातीत घालील अशा युद्धनौका चीन तयार करत आहे. पुढची लढाई ही जमिनीवर नाही तर पाण्यावर होण्याची शक्यता आहे. अशा पाण्यावर होणाऱ्या युद्धात आयएनएस विक्रांत सारख्या युद्धनौकाच लढाईचे नेतृत्व करू शकतात.
३) तारागिरी युद्धनौका –
भारतीय नौदलात तारागिरी नावाची आणखी एक युद्धनौका सामील होणार आहे. तारागिरी युद्धनौकेच्या कामाची सुरुवात एक वर्षापूर्वी करण्यात आली होती. या युद्धनौकेचे वजन ३५१० टन असेल. दोन टर्बाईन, दोन डिझेलचे इंजिन यात असेल. यात मिसाईल सिस्टीम व रॉकेट लॉंचर देखील असेल. याआधी उदयगिरी आणि सुरत या युद्धनौका देखील भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल करण्यात आल्या आहेत.
आयएनएस विक्रांत सारख्या मोठ्या युद्धनौकेसोबत तारागिरी सारख्या मध्यम आकाराच्या युद्धनौका देखील अतिशय महत्वाच्या असतात. लढाईत जितका सेनापती महत्वाचा असतो. तितकेच शूरवीर सैनिक हवे असतात. या दोघांच्या बळावरच आपण कितीही कठीण वाटत असलेली लढाई जिंकू शकतो.
गेल्या काही दिवसात घडलेल्या या तीन घटनांनी भारतीय नौदल हिंदी महासागरातील एक बलाढ्य नौदल म्हणून पुढे आलेलं आहे. भारतीय समुद्रात आक्रमण करण्यापूर्वी कोणत्याही शत्रूला आता दहावेळा विचार करावा लागेल. यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे काही आपण कोणत्या देशाकडून मागवलेलं नाही तर स्वतः बनवलेलं आहे.