शिवाजी पार्क दसरा मेळावा माहिती | dashara Melava |

शिवाजी पार्क दसरा मेळावा माहिती | dashara Melava |

शिवाजी पार्क दसरा मेळावा माहिती | dashara Melava |

महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यापासून शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात चांगलाच सामना रंगला आहे. विधानसभेच्या पायऱ्यापासून ते रस्त्यावरच्या सभेपर्यंत लढाई चाललेली आहे. आता ही लढाई शिवाजी पार्कच्या मैदानात आलेली आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी दोन्ही गटात चढाओढ सुरु झालेली आहे. शिंदे गट शिवसेनेतून बाहेर पडला असला तरी आम्हीच शिवसेना आहोत. असा दावा वारंवार करतो आहे. शिवसेना संघटनेचे जशी रचना आहे, त्याच प्रकारची रचना शिंदे गटाने केलेली आहे. नेते, उपनेते, जिल्हाप्रमुख, अशी पदे निर्माण करून त्याजागी अनेक पदाधिकार्यांची नेमणूक केलेली आहे. शिंदे गटाने शिवसेना भवन उभारणार असल्याची घोषणा देखील केलेली आहे. एकूणच स्वतःला खरी शिवसेना म्हणवून घेण्यासाठी शिंदे गट अनेक प्रकारचे प्रयत्न करताना दिसून येत आहे.

खरी शिवसेना कोणती आहे आणि धनुष्यबाण कोणाला मिळणार? या प्रश्नांचे उत्तर तर न्यायालयात आणि निवडणूक आयोगात मिळेल. न्यायालय आणि निवडणूक आयोगात चर्चा चालू राहील आणि निकाल जेव्हा यायचा आहे तेव्हा येईल. सध्या शिवसेना आणि शिंदे गटासाठी सर्वाधिक महत्वाचा प्रश्न झाला आहे तो म्हणजे शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा.

दसरा मेळाव्याला परवानगी मिळवण्यासाठी शिवसेना आणि शिंदे गट मुंबई महानगरपालिकेत गेला. हा वाद काही मुंबई महानगरपालिकेत किंवा राज्य पातळीवर सुटणारा नव्हता. त्यामुळे इतर वादासारखा हा वादही उच्च न्यायालयात गेला तेव्हा आता मुंबई उच्च न्यायालयातच ठरेल की, शिवाजी पार्कवर कोणाची सभा होणार किंवा कोणाची होणार की नाही. त्यात अजून एक मजेदार गोष्ट होत आहे. ती म्हणजे शिवाजी पार्कवर राजे ठाकरे यांच्या सभेची. आता हा सामना तिरंगी झालेला आहे.

या संपूर्ण प्रकरणात महत्वाचा प्रश्न हा आहे की, शिवसेना किंवा शिंदे गटासाठी दसरा मेळावा एवढा महत्वाचा का आहे? हे आपण पुढील पाच मुद्द्याच्या आधारे समजून घेऊया.

१) शिवाजी पार्क आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नाते –

शिवसेनेची स्थापना १९ जून १९६६ रोजी झाली आणि दसरा मेळाव्याची पहिली सभा ३० ऑक्टोबर १९६६ ला झाली. शिवसेनेला आणि बाळासाहेब ठाकरेंना महत्वाची ओळख याच शिवाजी पार्कने मिळवून दिली. बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६ पासून २०११ पर्यंत दरवर्षी शिवाजी पार्कवर सभा केलेली आहे. याच शिवाजी पार्क मध्ये बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची दिशा सांगायचे.

शिंदे गट सतत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतो आहे. आम्ही त्यांच्याच विचारावर चाललो आहे. हे लोकांच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न करतो आहे. यामुळेच त्यांच्या भाषणात बाळासाहेब ठाकरे यांचे नाव असते. शिंदे गटाच्या प्रत्येक फ्लेक्सवर दोनच महत्वाचे फोटो असतात ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे. आता शिवसेना आणि बाळासाहेब यांचे नाते अतूट आहे. शिवसेनेवर हक्क सांगायचा असेल तर बाळासाहेबांचे नाव सर्वात महत्वाचे आहे. याच कारणामुळे शिंदे गट शिवाजी पार्कवर सभा घेऊ इच्छितो आहे. एवढेच नाही तर बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतीस्थळ हे शिवाजी पार्क मध्येच आहे.

२) शिवसेनेचे विचार आणि शिवाजी पार्कचे मैदान –

शिवाजी पार्क वरील दसरा मेळावा म्हणजे विचारांचे सोने लुटण्याचा दिवस असे म्हंटले जाते. कारण शिवाजी पार्कवरील मैदानातच बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचे विचार मांडले आहेत. शिवसेना कोणत्या दिशेला जाणार? काय करणार ? याबद्दल सर्वकाही बाळासाहेब ठाकरे शिवाजी पार्कवरील मैदानात मार्गदर्शन करायचे.

वर्ष १९७५ च्या दसऱ्या मेळाव्यातच बाळासाहेब ठाकरे यांनी इंदिरा गांधीनी लावलेल्या आणीबाणीला समर्थन दिले होते. १९७८ मध्ये मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचा मोठा पराभव झाला होता. त्यानंतरच्या दसरा मेळाव्यात बाळासाहेबांनी मुंबईकरांना उद्देशून म्हटले होते की, तुमचा जर माझ्यावर विश्वास नसेल तर मी शिवसेना सोडून देतो अशी घोषणा केली होती. या दसरा मेळाव्यानंतर झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचा मोठा विजय झाला होता. अजून एक उदाहरण सांगण्यासारखे आहे. १९९१ च्या दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे यांनी एक मोठी घोषणा केली की, मुंबईच्या वानखेडे मैदानात पाकिस्तानचा सामना कसल्याही परिस्थितीत होऊ दिला जाणार नाही. तेव्हा दोन – चार शिवसैनिकांनी आदल्या दिवशी वानखेडे मैदानात जाऊन चक्क पीच खोदलं आणि त्यावर डांबर टाकलं. यामुळे त्यावेळी काही पाकिस्तानचा सामना झाला नाही. अशा सर्व मोठ्या घटनांचा साक्षीदार शिवाजी पार्क हे मैदान राहिलेलं आहे.

सध्या शिवसेनेत मोठे वादळ उठले आहे. ते वादळ आपल्या बाजूने करण्यासाठी शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची सभा घेणे दोन्ही गटांना गरजेचे आहे.

३) शिवसैनिकांना आवाहन –

शिंदे गटात आमदार आणि खासदार गेले असले तरीही शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहेत. शिवसेनेची खरी ताकद आमदार किंवा खासदार नसून तळागाळातील हाकेला धावून येणारे शिवसैनिक आहेत. यामुळेच उद्धव ठाकरे शिवसैनिकाकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेत आहेत. हे साध सरळ गणित आहे की, ज्याच्या बाजूने शिवसैनिक असेल त्याची शिवसेना असेल. शिवसैनिक असेल तर येणाऱ्या निवडणुकीत आपल्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता आहे. हे दोघांनाही माहिती आहे. त्यामुळे दोन्ही गट शिवसैनिक आपल्या बाजूने कसे येतील. यासाठी कसोशीने प्रयत्न करताना दिसत आहेत.

शिवसैनिक आपल्या बाजूने करायचा असेल तर शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याची सभा फार महत्वाची आहे. शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा आणि शिवसैनिक यांचे नाते बाप- मुलासारखे आहे. या दसरा मेळाव्यातूनच पुढील वर्षभरात काय करायचे? हे शिवसैनिकांना स्पष्ट होतं. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे शिवसेनेत विचारापेक्षा भावना महत्वाची आहे. भावनेवर चालणारा हा पक्ष आहे. शिवसैनिकांची भावना ही शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याशी खूप जोडलेली आहे. या कारणामुळे जो शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेईल. त्या व्यक्तीला शिवसेना प्रमुख म्हणून शिवसैनिक स्वीकारण्याची शक्यता अधिक आहे.

४) शक्तीप्रदर्शन करण्याची संधी –

राजकारणात शक्तिप्रदर्शनला खूप मोठे महत्व आहे. या शक्तिप्रदर्शना वरूनच एखाद्या पक्षाची ताकद किती आहे. याचा अंदाज बांधता येतो. तसेच या शक्तिप्रदर्शन भव्य दिव्य असेल. त्यात लाखोची संख्या आलेली असेल तर राजकीय वातावरण पूर्णपणे बदलून टाकता येते. आपल्या बाजूने वळवता येते. सध्या आदित्य ठाकरे महाराष्ट्र दौरा करत आहेत. ठिकठिकाणी मोठ्या सभा घेत आहेत. गणपती विसर्जनानंतर उद्धव ठाकरे देखील महाराष्ट्र दौरा करणार आहेत. याचा उद्देश हाच आहे की शिवसैनिकांना आपल्या बाजूने वळवून शक्तीप्रदर्शन करणे. या पूर्ण दौऱ्यात जेवढा प्रभाव पडणार नाही, त्यापेक्षा अधिक प्रभाव हा शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात पडू शकतो. या शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात महाराष्ट्राच्या काना- कोपऱ्यातून लाखो शिवसैनिक येत असतात. या दसरा मेळाव्यातून पूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिकांना संदेश देता येतो. जेव्हा शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यात लाखो शिवसैनिक येतील. त्यावेळी पूर्ण वातावरण बदलून जाईल. या कारणामुळे दोन्ही गट शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत.

५ ) बंडखोरी केलेल्या आमदार, खासदारांना संदेश –

शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदा सर्वात मोठी बंडखोरी झालेली आहे. याआधी नारायण राणे, छगन भुजबळ यांनी बंडखोरी केली पण त्यामुळे शिवसेनेला खूप काही फरक पडला नाही. सध्या शिवसेनेत मोठी बंडखोरी झाल्याने शिवसेनेच्या अस्तित्वावरच संकट निर्माण झाले आहे. ज्या आमदार – खासदारांनी बंड केले आहे. त्यांना मोठा संदेश शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यातून देता येईल. उद्धव ठाकरे यांचा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा झाला आणि त्यात लाखो शिवसैनिक आले तर शिंदे गटात गेलेल्या आमदार- खासदारांची चलबिचल होऊ शकते. शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या सोबत असलेले पाहून काही आमदार- खासदारांचे मनही बदलू शकते.

दुसऱ्या बाजूने बघितले तर एकनाथ शिंदे यांची सभा शिवाजी पार्कवर झाली आणि त्याला मोठ्या प्रमाणात शिवसैनिक आले तर एकनाथ शिंदे सोबत असलेले आमदार, खासदारांच्या मनातही एकनाथ शिंदे यांच्या क्षमतेबद्दल कसलीही शंका राहणार नाही.

या अनेक कारणामुळे शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा अत्यंत महत्वाचा आहे. आता येत्या काळात ठरेल की शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा कोण गाजवणार? जो कोणी गाजवेल त्याचे पारडे जड असेल. हे मात्र नक्की…

Leave a Comment